रत्नागिरी : जिल्ह्यातील केरोसीन व धान्य वितरण व्यवस्थेतील विविध अडचणींमुळे रेशन दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या सर्व प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक / मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वितरण व्यवस्थेतील दोष दूर करून केरोसीन व धान्य वितरण सुरळीत करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत केरोसीन वितरणासाठी यंत्रणा राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष वितरण करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे दुकानदारांनी स्पष्ट केले आहे. शासनाच्या नियमांनुसार केरोसीन थेट धान्य दुकानापर्यंत पोहोचणे आवश्यक असून सर्व कार्डधारकांना केरोसीन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र दुकानदारांना तात्काळ केरोसीनचे बिल भरणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नसल्याने वितरण प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
केरोसीन वितरणानंतरच संबंधित बिलाची रक्कम अदा करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे. या अडचणी दूर न झाल्यास जिल्ह्यातील दुकानदार केरोसीन वितरणासाठी तयार नसल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दुकानदारांकडून पॉज मशीनच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात असले तरी अनेक कार्डधारकांना अद्याप धान्य मिळाले नसल्याचे समोर आले आहे. गोदामांमध्ये वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने वितरण रखडल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे.
याशिवाय पॉज मशीन प्रणालीवरून एप्रिल महिन्याचा धान्य साठा काढून टाकण्यात आल्याने उर्वरित लाभार्थ्यांना धान्य देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एप्रिल महिन्याचे धान्य ‘कॅरी फॉरवर्ड’ करून पुन्हा उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून उर्वरित कार्डधारकांना वेळेत तीन महिन्यांचे धान्य वितरण करता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, दुकानदारांनी धान्य वितरणाचे काम पूर्ण केले असतानाही त्यांचे वितरण कमिशन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे अनेक दुकानदारांवर आर्थिक संकट ओढावले असून व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. प्रलंबित कमिशन तात्काळ अदा करावे, अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक / मालक संघटनेचे अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना निवेदनाच्या प्रती पाठवून या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना धान्य व केरोसीन वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.














