राजापूर : मद्यधुंद एसटी चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राजापूर : तालुक्यातील मुर आंबा एस.टी. बस थांब्याजवळ एका ४४ वर्षीय एसटी चालकाला मद्यधुंद अवस्थेत बस चालवताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.२० वाजता घडली. या निष्काळजीपणामुळे बसमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी रायपाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश हिंदुराव केसरकर (वय ४४) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस एम.एच. १४ बी.टी. ४७३७ क्रमांकाची बस चालवत होता. मुर आंबा बस थांब्याजवळ चढणावर असताना, केसरकर याने निष्काळजीपणे बस रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे बसचा पुढील टायर फुटला, बाजूचा टायर एका दगडावर आदळला आणि डाव्या बाजूचा आरसा एका झाडाला लागून फुटला.

बसमध्ये असलेले स्वप्नील शंकर कदम (वय ३६) आणि इतर प्रवाशांना चालकाने मद्यपान केल्याची शंका आली. त्यांनी तात्काळ त्याला रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात नेले. तेथे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत केसरकर याने मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले.

या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी सुरेश केसरकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपाटण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एका सार्वजनिक वाहतूक सेवेतील चालकाने अशा प्रकारे निष्काळजीपणा दाखविल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 10/May/2025