देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी महेश तोरसकर यांची नियुक्ती

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी महेश महादेव तोरसकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांना विविध स्तरातील व्यक्तींकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

यापुर्वी निखिल पाटील हे जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरीता २९ आठवड्यांसाठी देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांचा ३ मे रोजी प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची मुंबई येथे पुढील प्रशिक्षणासाठी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याजागी देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी महेश तोरसकर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. महेश तोरसकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगावचे आहेत. अतिशय शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या पोलीस सेवेची सुरुवात २०११ साली मुंबईतील सायन येथून सुरू झाली. याठिकाणी ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. २०१४ पर्यंत त्यांनी आपली सेवा दिली. यानंतर २०१४ ते २०१७ पर्यंत ट्रॉम्बे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक, २०१७ ते २०२२ क्राईम ब्रँच युनिट-६, मुंबई, २०२२ ते २०२३ वडाळा टिटि येथे त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून बढती झाली. त्यानंतर २०२३ ते २०२४ मध्ये ते रत्नागिरी शहर येथे कार्यरत होते.

त्यांनी तीन महिने जिल्हा वाहतूक शाखेत काम केले. यानंतर आता त्यांची देवरूख येथे बदली झाली असून याठिकाणी ते पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाले आहेत. अतिशय शिस्तप्रिय असा त्यांचा स्वभाव आहे. आपण सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून देवरूख शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांना संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेतर्फे अध्यक्ष सचिन मोहिते, सचिव निलेश जाधव, खजिनदार सुरेश करंडे, सल्लागार प्रमोद हर्डीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 10/May/2025