रत्नागिरी : ३१ मेपासून पावसाळी मासेमारीस बंदी

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर पर्ससीन नेट मासेमारी नौकांची आवराआवर सुरू झाली आहे. नौकांवरील जाळी उतरवून तसेच नौकांची डागडुजी करून त्या शाकारून ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. दि. ३१ मेच्या मध्यरात्रीपासून पावसाळी मासेमारी बंदी सुरू होत आहे. या वर्षीचा मासेमारी हंगाम फारच तोट्याचा गेल्याचे पर्ससीन मच्छीमार जावेद होडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७कि.मी. चा समुद्र किनारा लाभला असून, सुमारे पावणेतीन हजार यांत्रिकी आणि बिगरयांत्रिकी नौका मासेमारी करतात. यातील सुमारे २५० नौका पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या आहेत. दि. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. पर्ससीन नेट मासेमारी नौकांवर मोठ्या प्रमाणात परराज्यातील खलाशी, पागी, तांडेल कामासाठी आणले जातात.

या सर्व कामगारांना १० ते २० मे पर्यंत पर्ससीन नेट नौकांवरून कार्यमुक्त करण्याचा करार नौका मालकांकडून केलेला असतो. त्यानुसार पर्ससीन नेट मासेमारी नौकांची कार्यवाही सुरू झाली आहे. मासेमारीचा यंदाचा हंगाम झालेला खर्च वसूल करण्याइतकाही चांगला होवू शकला नाही. एका पर्ससीन नौकेवर सुमारे ३५ खलाशी, पागी, तांडेल असतात. त्यांना दर आठवड्याला पगार द्यावा लागतो. मासेमारीसाठी समुद्रात जाताना नौकेच्या इंधनासह जेवणाचे जिन्नसही भरून द्यावे लागते. हा झालेला खर्चही यंदा मासळी अपेक्षित प्रमाणात न मिळाल्याने वसूल होवू शकला नाही, असे मच्छिमार नेते जावेद होडेकर यांनी सांगितले.

२० मेपर्यंत पर्ससीन नौकांची मासेमारी थांबणार
पर्ससीन नेट नौकांवरील खलाशी, पागी आणि तांडेल यांना राहिलेला पगार देऊन नौका मालक त्यांची कामावरून मुक्तता करून लागले आहेत. त्यामुळे मासेमारी नौका बंदरात आणून त्यावरील जाळी काढून सुकवण्यासाठी ट्रकमधून नेली जाऊ लागली आहेत. त्याचवेळी पावसाळ्यात नौका नादुरुस्त होऊ नयेत, यासाठी आवश्यक असणारी देखभाल दुरुस्तीची कामे करून घेतली जात आहेत. येत्या २० मेपर्यंत बहुसंख्य पर्ससीन नौकांची मासेमारी थांबणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 12/May/2025