लांजेकर नगर येथील घटना; डीपफ्रिजर, दुचाकी आणि ५१ किलो गोवंश मांसासह १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी: शहरातील उद्यमनगर परिसरातील लांजेकर नगर येथे बेकायदेशीरपणे गोवंश प्राण्यांच्या मांसाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी (Ratnagiri Crime News) लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. लांजेकर नगर, रत्नागिरी) या आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून १ लाख ६ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एलसीबीच्या पथकाने २६ जून रोजी सायंकाळी ४.५५ वाजताच्या सुमारास लांजेकर नगर परिसरात छापा टाकला. या वेळी आरोपी लियाकत दावत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही परवान्याशिवाय गोवंश प्राण्यांचे मांस विक्रीसाठी बाळगून असताना पोलिसांना मिळून आला.
डीपफ्रिजर आणि ॲक्टिव्हा दुचाकी जप्त
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ७ किलो आणि ४४ किलो ५०० ग्रॅम असे एकूण ५१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे गोवंश मांस जप्त करण्यात आले. यासोबतच मांस वाहतुकीसाठी वापरलेली होंडा ॲक्टिव्हा दुचाकी (क्र. एमएच ०८ एझेड ६४८५) आणि मांस साठवणुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा व्होल्टास कंपनीचा एक मोठा डीपफ्रिजर, असा एकूण १,०६,४८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ च्या विविध कडक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, हा साठा कुठून आणला गेला आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 27-06-2026














