Sanjay Raut on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) आणि अजित पवार गट (NCP Ajit Pawar Faction) एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जे येतील ते आमच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्हाला मधल्या काळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विषयी वाटले होते की आता संघर्ष सुरू राहील. आमचा देखील संघर्ष सुरू आहे. पण, दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळात पवार साहेबांचा अपमान केला, त्याची आम्हाला खंत वाटते आहे. आम्ही तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो. हे सहकार आणि इतर विषय नंतर… आमच्यामुळे काही अडत नाही, आपल्यामुळे राष्ट्र आणि जग अढते यातून राजकारण्यांनी बाहेर पडावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.
शरद पवारांचं राजकारण वेगळं
शरद पवार यांनी त्यांचा संघर्ष संपवलेला आहे, असे तुम्हाला वाटते का? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला असं वाटत नाही. पण, त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे. जे येतील ते आमच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र आहे. आला तर सोबत नाहीतर तुमच्याविना संघर्ष सुरु राहणार, असे त्यांनी म्हटले.
त्यांच्या शिवाय हा संघर्ष सुरूच
शरद पवारांशिवाय तुमचा संघर्ष सुरू राहणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकूमशाही विरोधात आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला महाराष्ट्र कंगाल केला. मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांचे कारस्थान सुरू आहे, त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. जे आमच्या सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊ नाहीतर त्यांच्या शिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत, असे त्यांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 12-05-2025
