दापोली : कोरड्या विहिरीत पडलेल्या मगरीला अज्ञाताने जिवंत जाळले

दापोली : दापोली तालुक्यातील मौजे गावतळे येथे एका कोरड्या विहिरीत पडलेल्या मगरीला अज्ञात व्यक्तीने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्पमित्र तुषार महाडीक यांनी ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता वन विभागाला एका मगरीबाबत माहिती दिली होती. गावतळे येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याचे त्यांनी कळवले. त्यानुसार, परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील यांच्यासह वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव आणि विश्वंभर झाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

परंतु, पाहणीत विहिरीत मगर आढळली नाही. परिसराची तपासणी करत असताना, विहिरीपासून ५० मीटर अंतरावर दक्षिण दिशेला आग लागलेली दिसली. अधिक जवळ जाऊन पाहिल्यावर त्या आगीत मगर जळत असल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली आणि जळालेल्या मगरीचे अवशेष तसेच तोंडाचा शिल्लक भाग तपासणीसाठी ताब्यात घेतला. वनरक्षक शुभांगी रा. भिलारे यांनी या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस आणि वन विभाग या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास किंवा अशा प्रकारची कोणतीही घटना निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरित वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ यावर संपर्क साधावा. जिवंत मगरीला मारून जाळणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वन विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 12/May/2025