खेड : मुंबई-गोवा महामागांवरील कशेडी टॅप हद्दीत २०२५ या चालू वर्षातील पहिल्या ४ महिन्यांत १० अपघातांची नोंद करण्यात आली आहे. ४ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर ३१९० वाहनांची चौकशी करत दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापोटी महसूल म्हणून सुमारे ३७ लाख ३६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
बोगद्यातून मार्गस्थ होणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी गतवर्षपिक्षा मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी पोलिस टैप हद्दीत अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अपघाती मृत्यूचे प्रमाण अद्याप चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल २५ या कालावधीत चालू वर्षांमध्ये महामार्गावर एकूण अपघातांची संख्या १० असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
महामार्गावर अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून बहुतांशी अपघात वेगवान वाहन चालवल्यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात शेकडो अपघातात चालकासह प्रवाशांना मृत्यू, गंभीर जखमी याला सामोरे जावे लागले आहे. कमी वेळेत जादा वाहतूक करण्याच्या प्रयत्नात अनेकदा चालक वेगाने वाहने मार्गस्थ करत आहेत.
त्यामुळे नियंत्रण सुटते त्याचप्रमाणे २४ तास वाहन चालवल्याने पुरेशी झोप मिळत नसल्याने झोपेअभावी डोळ्यावर येणारी झापड अपघाताचे कारणे आहे. अपघातावर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती, माणसाच्या जीवन प्रणालीचे महत्त्व, वाहतुकीचे नियम, त्याचे फायदे व तोटे नव्याने समजून देणे गरजेचे बनले आहे.
पोलिस दलात अत्याधुनिक वाहने दाखल झाली मुंबई-गोवा महामार्ग कोकणसाठी महत्त्वाचा आहे. महामार्गावरील वाहनांची तपासणी व अपघाताप्रसंगी तातडीची यंत्रणा राबवण्यासाठी पलस्पे फाटा ते तळ कोकणपर्यंत ७ ठिकाणी महामार्ग पोलिस यंत्रणा उभारण्यात आली आहे. यापैकी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर कशेडी महामार्ग पोलिस यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या विभागाने आपल्या अधिपत्याखाली असलेल्या मार्गावर केलेल्या वाहनांवरील कारवाईपोटी लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. महामार्ग पोलिसांनी २०१५ मध्ये सर्वाधिक वाहनचालकांवर कारवाई केली होती गेल्या वर्षभरात पोलिस दलात बदल झाले असून अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत.
ऑनलाईन प्रणालीसह विविध नियमाचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ केल्याने महसूलमध्ये वाढ होत आहे. कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम राहिल्याने हा मार्ग कायम चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या दिमतीला नवीन वाहन असले तरी क्रेन ची कमतरता भासत आहे. अपघात घडल्यास महामार्ग विभागाकडे हक्काची क्रेन नसल्याने बाहेरील क्रेनच्या आधारावर राहावे लागत आहे. महामार्ग पोलिस जनजागृतीसह सुरक्षा सप्ताहासारखे कार्यक्रम योग्य पद्धतीने करत आहे. गेल्या वर्षपेक्षा यावर्षी नियम तोडणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 13/May/2025
