रत्नागिरी : नौकामालक दोन दिवसांत शाकारलेल्या नौका हलविणार

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारलेल्या मच्छीमार नौका हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात जेटीवर दाखल झाले. परंतु काल बहुतेक मासेमारी बंद असल्याने सर्वच नौका बंदरात लावून ठेवल्या होत्या. त्यामुळे जेटीवर शाकारलेल्या नौकांच्या मागे इतर नौका उभ्या होत्या. त्यामुळे शाकारुन ठेवलेली एकही नौका हलवता आली नाही. २१ नौकामालकांनी पुढील दोन दिवसात नौका हलवितो, असे सांगितल्याने कारवाई थांबविण्यात आली.

पावसाळी मासेमारी बंदी ३१ मेच्या मध्यरात्रीपासून सुरू होते, परंतु काही मच्छीमारांनी आधीपासूनच मासेमारी बंद करून नौका मिरकरवाडा बंदरातील जेटीवर प्लास्टिक आच्छादून शाकारुन ठेवल्या आहेत.

शाकारलेल्या नौकांमुळे समुद्रात मासेमारी करून बंदरात परतणाऱ्या नौकांना अडचण होऊ लागली आहे. त्यांच्या नौकांवरील मासळी उत्तरविणे व साहित्य नौकांमध्ये चढविणे जिकीरीचे होऊन गेले. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या नौकांमालकांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा प्राधिकरणाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.

मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या नौकांच्या मालकांना नोटीस बजावून त्या नौकांचा इतर नौकांना अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी उभ्या करण्यास सांगितले. परंतु या नौकामालकांकडून नोटीसला प्रतिसाद न मिळाल्याने आज पोलिस बंदोबस्तात शाकारलेल्या नौका हटविण्याचे नियोजन झाले.

मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षक, होमगार्ड आणि पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली.

शाकारून ठेवलेल्या नौका मालकांना बोलवून त्यांच्या नौका नेटीवरुन हलवून दुसरीकडे उभ्या करण्यास सांगितले. परंतु आज असल्याने नौकांची मासेमारी बंद असल्याने या सर्व नौका बंदरात उभ्या होत्या. त्यामुळे शाकारलेल्या नौका सुरू करून दुसरीकडे नेणे शक्य नव्हते. या नौकांमालकांनी पुढील दोन दिवसात नौका दुसरीकडे नेण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

आश्वासन न पाळल्यास कार्यवाही
नौकामालकांनी दोन दिवसांत शाकारलेल्या नौका हलवतो असे आश्वासन दिले आहे. त्यांनी हे आश्वासन न पाळल्यास फौजदारी कारवाईसह नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही, असा इशाराही मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 17/May/2025