चिपळूण : कळंबस्ते-आंबडस मार्गावर जलजीवन योजनेची गटारातून पाईपलाईन

चिपळूण : शहरालगतच्या कळंबस्ते ते आंबडस असलेल्या गटारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यालगतच्या गटारांची समस्या निर्माण होणार असून, संबंधित यंत्रणेने याची दखल घ्यावी. अन्यथा, या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे.

पंधरागाव विभागातील काही गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने पाईपलाईन थेट गटारातून टाकली आहे. काही किमी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातच पाईपलाईन टाकल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत माजी सभापती शौकत मुकादम यांनी आक्षेप घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकाऱ्यांचे अधिकारी श्री. नाईक यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आपण लवकरच या कामाची पाहणी करू आणि संबंधित ठेकेदाराला सूचना देऊ, असे सांगितले. यावर मुकादम यांनी आक्षेप घेतला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गटारांची साफसफाई करण्यात येते.

गटार नसलेल्या ठिकाणी गटार काढण्यात येते. मात्र, त्याच गटारात पाईपलाईन टाकली जात असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा?, संबंधित ठेकेदार तेच गटार दोन ते तीन फूट आणखी खणून पाईपलाईन टाकत आहेत. त्यामुळे भविष्यात या पाईपलाईनला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. गटाराच्या बाहेरून ही पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

आंवडस रस्ता हा खेड येथील सार्वजनिक त्या बांधकाम विभागांतर्गत येतो. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर या रस्त्यालगत असलेल्या पाईपलाइनबाबत आपल्याला कोणती कल्पना नाही, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची एनओसी घेतलेली नाही. संबंधित ठेकेदार रात्रीच्या वेळी काम करीत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनदेखील संबंधित ठेकेदार व यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 17/May/2025