चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या सुमारे साडेतीन एकर पडीक जागेत देवराई उभारण्यात येणार आहे. या देवराईत विविध प्रकारची देशी प्रजातीची २०० हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होताच रोपांची लागवड केली जाणार आहे. विविध खासगी कंपन्या, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे, तसेच लोकसहभागातून तालुक्यात प्रथमच देवराई उभारण्यात येत आहे.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी देवराई उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. कळंबस्ते येथे पशुसंवर्धन विभागाची रेल्वे फाटक आणि चिपळूण धामणंद या मुख्य रस्त्यालगत साडेतीन एकर जागा कित्येक वर्षे पडीक आहे. याठिकाणी देवराई उभारणीसाठी जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
या जागेचे सपाटीकरण करून जमिनीच्या चारही बाजूला तारेचे कंपाउंड घालण्यात येणार आहे. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी येथे ठिबक सिंचनाची व्यवस्था केली जाणार आहे.
देवराईसाठी जिल्ह्यातील विविध नर्सरीतून देशी प्रजातीची रोपे घेतली जाणार आहेत. तसेच अपेक्षित रोपे न मिळाल्यास ती पुणे येथून आणण्याचे नियोजन आहे. पर्यावरणप्रेमी भाऊ काटधरे यांच्यासह तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी, ‘महसूल’चे अधिकारी व कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, पंचायत समिती, लोटे एमआयडीसीतील विविध कंपन्या, क्रीडाई यांच्यासह लोकसहभागातून ही देवराई उभारण्यात येणार आहे.
देशी-विदेशी २०० झाडांची लागवड
या देवराईत सुमारे २०० हून अधिक देशी प्रजातीची झाडे लावली जातील. झाडांची माहिती देणारे फलक व अधिक माहितीसाठी त्याचा क्यूआर कोड दोन्ही झाडांच्या मध्यभागी लावण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निगा राखणे, त्यांचे संगोपन करणे, याची जबाबदारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेवर सोपवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 17/May/2025













