कोसुंबनजीक क्रेनच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

साडवली : देवरूख संगमेश्वर मार्गावरील कोसुंबनजीक असलेल्या दत्त मठ येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने धडक दिल्याने चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (ता. १८) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली. सावित्री राजाराम सावंत (वय ६५, रा. कनकाडी एरंडेवाडी, संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे.

देवरूख पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जयेंद्र गजानन सावंत (रा. कनकाडी एरंडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जयेंद्र सावंत व सावित्री सावंत या दुचाकीवरून (एमएच-०८-एन-०३८८) रविवारी सकाळी बुरंबी येथील मुलीकडे जात होत्या. बुरंबीच्या दिशेने जात असताना कोसुंबनजीक असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे जयेंद्र सावंत याने दुचाकी थांबवली.

यावेळी सावित्री सावंत या रस्त्यालगत उभ्या होत्या. अहम्मद अली रझा (२७, रा. उत्तरप्रदेश) हा क्रेन घेऊन देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात होता. कोसुंब येथील उतारात अहम्मद याचे क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या सावित्री सावंत यांना जोरदार धक्का बसला आणि त्या क्रेनखाली चिरडल्या.

अपघातात सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून जयेंद्र सावंत यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अहमद रझा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सावित्री सावंत यांच्या मृतदेहाचे देवरूख रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी सावित्री सावंत यांच्यावर कनकाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 19/May/2025