राजापूर : फार्मर आयडी काढण्यास शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद

राजापूर : शासनाच्या पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने अॅग्री स्टॅक प्रोगामंतर्गत आपली शेतजमीन आधारकार्डशी संलग्न करीत फार्मर युनिक आयडी काढणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांच्यामार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृती केली जात आहे. त्याला शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. त्यामुळे फार्मर युनिक आयडी काढण्याचे शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणे त्याच्या शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून देणारा फार्मर युनिक आयडी देण्यात येणार आहे. या आयडीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याची माहिती एकत्र संकलित होणार आहे. याव्यतिरिक्त फार्मर युनिक आयडीमुळे शेतकऱ्यांना पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज, पिकांबाबत सल्ला, हवामानाबाबत माहिती व सल्ला, आपत्ती सल्ला व प्रतिसाद, बाजार भावाबाबत सल्ला, कीड व इतर रोगांबाबत सल्ला, कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला, मृदा आरोग्य माहिती यासारखी शेतीपूरक माहिती उपलब्ध होणार आहे.

तालुक्यामध्ये फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी ६४ हजार ११८ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी १८ हजार १६४ शेतकऱ्यांनी सद्यः स्थितीमध्ये फार्मर युनिक आयडी काढले असून, अद्याप ४५ हजार ९५४ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यामार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 19/May/2025