दापोली : तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या बिलजी मासळीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या मासळीचा आकार लहान असल्याने बाजारात तिला कवडीमोल भाव मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रति किलो १०० रुपयांपर्यंत भाव मिळणाऱ्या बिलजी माशाचा दर आता केवळ २५ रुपयांपर्यंत खाली आल्याने पारंपरिक मच्छीमार पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सध्या सर्वत्र बिलजी मासळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि हर्णे बंदरातही याची मोठी आवक दिसत आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे, मासळी अधिक प्रमाणात मिळत असली तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने येथील मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
पुणे आणि गोवा ही बिलजी मासळीची प्रमुख बाजारपेठ असल्याचे सांगितले जाते. मात्र, हर्णे बंदरात मासळी साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा नसल्यामुळे मिळेल त्या भावात मासळी विकावी लागत असल्याची खंत मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मासेमारीसाठी आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ३१ मे पर्यंतच मासेमारी करता येणार असल्याने पुरेसा मासा मिळत नसल्याची चिंता मच्छीमारांना आहे. त्यातच एलईडी आणि पर्सनेट मासेमारी करणाऱ्या नौकांचा पारंपरिक मच्छीमारांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार अधिकच अडचणीत सापडले आहेत. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच मासेमारीत अनेक अडचणी आल्या आणि आता जेव्हा थोडीफार मासळी मिळत आहे, तेव्हा तिला योग्य भाव मिळत नसल्याने मच्छीमार बांधवांमध्ये नाराजी आणि चिंता पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 19/May/2025














