मंडणगड : तालुक्यात सुरू असलेल्या मायनिंग वाहतुकीमुळे तालुकावासीयांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. शुक्रवारी रात्री शहरातील बाजारपेठेत झालेल्या अपघातामुळे शहर परिसरात फिरताना नागरिकांच्या मनात भीती वाटत आहे.
तालुक्यातून असलेल्या सुरु मायनिंग बॉक्साइट वाहतुकीमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे या बेभान चालकांवर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. दापोली तालुक्यातील रोवले ते महाड तालुक्यातील करंजाडी रेल्वे स्थानकापर्यंत मायनिंग वाहतूक सुरू आहे.
या भागात अपघात होण्याचे प्रमाण सातत्याने वाढलेले आहे. शहरातील परिस्थितीही अशीच असून रस्त्यालगत उभे असणाऱ्यांनाही डंपरची धडक बसल्याच्या घटना घडल्या आहेत.
शुक्रवारी बाणकोट रोड परिसरात डंपरने एका पादचाऱ्याला ठोकरले. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी अशा घटना वारंवार होत असल्याचे समोर येत आहे. या डंपरचालकाने मद्यपान केले असल्याची माहिती पुढे येत आहे.
विविध राज्यांतून आलेले डंपरचालक विविध प्रकारच्या नशा करून गाडी चालवत असल्याचे प्रकार याआधी उघड झाले आहेत. विविध प्रकारच्या नशा करून बेभान डंपर चालवणाऱ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही नागरिकांनी व्हायरल केले आहे. पोलिसांनी चालकांची वेळोवेळी तपासणी करावी, अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच धोकादायक वाहतुकीला आळा बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 19/May/2025














