रत्नागिरी : ग्रामपंचायत स्तरावर ‘फिल्ड टेस्टिंग कीट’ द्वारे जूनमध्ये होणार पाणी गुणवत्तेची तपासणी

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ‘फिल्ड टेस्टिंग कीट’ द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाची २ ते ७ जून या कालावधीत अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ५३४ गावामध्ये या अभियान दरम्यान ‘फिल्ड टेस्टिंग कीट’ द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली.

जिल्ह्यात फिल्ड टेस्टिंग कीटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी अभियानात जिल्ह्यात रासायनिक व जैविक कीटद्वारे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व १ हजार ५३४ गावांमध्ये नागरिकांना स्वच्छ, शुद्ध गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन यादव यांनी केले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ रत्नागिरी येथे १३ मे रोजी करण्यात आला.

१९ ते २३ मे या कालावधीत जनजागृती अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर तर २ २ ते ७ जून या कालावधीत अभियानाची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल.

या अभियानांतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदवलेल्या ५ महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवत्ता विषयक फिल्ड टेस्टिंग कीट प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना फिल्ड टेस्टिंग कीटद्वारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, या विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी तपासणी नमुने करणे यासह स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहेत.

व्यापक जनजागृती करावी या अभियानात सर्व शासकीय यंत्रणांनी सहभाग घेऊन पाणी गुणवत्ता तपासणी व व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 19/May/2025