खेड : डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरोदर मातांसाठी यशोदा योजना सुरू करण्यात आली असून, त्या अंतर्गत गेल्या वर्षभरात २ हजार ४७२ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यातील २६८ अतिजोखमीच्या मातांना विशेष उपचारपद्धती पुरवण्यात आल्या. तसेच ८४८ मातांची प्रसूती वालावलकर रुग्णालयामध्ये मोफत करण्यात आली.
वालावलकर रुग्णालयातर्फे गरोदर मातांसाठी २८ वर्षांपूर्वी यशोदा योजना सुरू केली होती. यामध्ये गरोदर स्त्रीला तिच्या घरी किंवा आरोग्य केंद्र, अंगणवाडीत भेट देऊन रक्तदाब आणि हिमोग्लोबीन तपासणे, बाळाच्या हृदयाचे ठोके मोजणे, रक्ताची तपासणी आणि बाळाच्या वाढीसाठी सोनोग्राफी करणे आणि आवश्यकता भासल्यास रुग्णालयातील वाहनानेच तिला रुग्णालयात आणून तिच्या विविध तपासण्या करणे असा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात २३४ गावांतील गरोदर मातांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत. या तपासणीत जोखमीच्या माता असल्याचे निदान वेळेआधीच झाले तर तिला वालावलकर माहेर योजनेतून उपचार दिले जातात. यामध्ये उत्तम पौष्टीक आहार, रक्त वाढीची इंजेक्शन्स दूध, पौष्टिक लाडू दिले जातात. आतापर्यंत २ हजार ४७२ गरोदर मातांना पौष्टिक लाडू दिले गेले. दर महिन्याला अशा महिलांचे डोहाळे जेवणही साजरे केले जाते. ओटी भरणे, जेवणाच्या पंक्ती, रांगोळ्या असा सर्व कार्यक्रम केला जातो. प्रसूतीनंतर माता आणि बाळ घरी जाताना तिला मोहगनी झाडाचे एक रोपटे भेट देऊन पाठवणी केली जाते.

स्त्रीरोग तज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. अनघा मोडक आणि सल्लागार डॉ. शीतल पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि सहकाऱ्यांमार्फत माता आणि बालकांवर उपचार केले जातात. समुपदेशक स्वाती सोनावणे, रुपाली चव्हाण या टीमसह महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आठ तालुक्यांतील उपचार
वर्षभरात यशोदा योजनेचा लाभ न मिळालेल्या चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, संगमेश्वर, राजापूर, मंडणगड, लांजा तालुक्यातील मातांपैकी काहीजणी अत्यंत गंभीर अवस्थेत वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्या. त्यातील काहींना अतिशय गंभीर रक्तक्षय, अति उच्च रक्तदाब, त्यामुळे घेरी, प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव होत असल्याचे तपासणीतून पुढे आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 11/Oct/2024
