“बँकेचा ‘ब’ न समजणाऱ्याला दिसतोय घोटाळा!” — जिल्हा बँक वार्षिक सभेत डॉ. तानाजी चोरगे यांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला

गेल्या २० वर्षांत पारदर्शक कारभारामुळेच बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; विरोधकांचे आरोप म्हणजे केवळ निवडणुकीच्या तोंडावर बदनामीचे कारस्थान: अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):

“गेल्या २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत जिल्हा बँकेच्या एकाही सभासदाने कामकाजाबाबत तक्रार केलेली नाही. मात्र, खेडमधील ज्या व्यक्तीला बँकेचा ‘ब’ ही कळत नाही, त्याला या पारदर्शक कारभारात घोटाळा दिसतोय! आगामी निवडणुका जवळ आल्यामुळेच विद्यमान संचालक मंडळाला बदनाम करण्याचे हे कारस्थान सुरू आहे. बँकेच्या कारभारात खरोखरच गैरव्यवहार असता, तर नाबार्ड (NABARD) किंवा आरबीआयने (RBI) गप्प बसून कारवाई केली नसती का? तसे काही असते तर आम्हाला फासावरच चढवले असते,” अशा अत्यंत परखड आणि आक्रमक शब्दांत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला.

रत्नागिरी शहरातील जयेश मंगल कार्यालयात डॉ. तानाजी चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि मोठ्या जनसमुदायामध्ये पार पडली. विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सभा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

साखर कारखान्यांवरील कर्जवाटप पूर्णपणे ‘आरबीआय’च्या नियमांनुसारच!

जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबत विरोधकांकडून होणाऱ्या बिनबुडाच्या आरोपांचा छेद घेताना डॉ. तानाजी चोरगे यांनी सर्व आकडेवारीच सभेसमोर मांडली.

ते म्हणाले, “केवळ आपल्या जिल्हा बँकेनेच नव्हे, तर राज्य बँक आणि इतर प्रमुख बँकांनी एकत्र येऊन ‘प्रधान बँक’ (Lead Bank) च्या माध्यमातून हे कर्जवाटप केले आहे. या सर्व कायदेशीर कर्जव्यवहारामुळे आपल्या बँकेला तब्बल १२९ कोटी ३० लाख रुपयांचे व्याज मिळाले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब ठेवीदारांना वेळेवर व्याज देता यावे, याच उदात्त हेतूने ‘आरबीआय’च्या (RBI) निकषांचे तंतोतंत पालन करून हे व्यवहार करण्यात आले आहेत.”

२० वर्षांतील कठोर निर्णयामांमुळेच बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. चोरगे यांनी बँकेच्या २० वर्षांतील यशस्वी प्रवासाचा पट मांडला:

“२० वर्षांपूर्वी जेव्हा मी बँकेची सूत्रे हाती घेतली, तेव्हा बँकेचा ‘एनपीए’ (NPA) तब्बल ६३ टक्क्यांपर्यंत गेला होता. बँक मोठ्या संकटात होती. मात्र, सर्व संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही घेतलेल्या कठोर आणि शिस्तबद्ध निर्णयांमुळेच आज ही बँक संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम बँक म्हणून नावारूपाला आली आहे.

सहकारात राजकारण आणल्यास संस्था बुडते, हे तत्त्व आम्ही तंतोतंत पाळले आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवली. माझ्या संपूर्ण २० वर्षांच्या कारकिर्दीत एकाही संचालकाने कर्ज घेऊन ते बुडवले आहे, असे एकही प्रकरण घडलेले नाही,” असे डॉ. चोरगे यांनी आत्मविश्वासाने स्पष्ट केले.

भविष्यात सहकार टिकवण्यासाठी चांगल्या माणसांची निवड करा!

सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवरून होणारी बदनामी ही केवळ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी सुरू आहे, असे सांगत डॉ. तानाजी चोरगे यांनी सभासदांना आवाहन केले की, “भविष्यात ही बँक आणि सहकार क्षेत्र टिकवून ठेवायचे असेल, तर अशा अफवांना बळी न पडता चांगल्या, प्रामाणिक आणि अनुभवी माणसांनाच बँकेवर निवडून द्या.”

नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचा विशेष सत्कार

आमदार होण्यापूर्वी जिल्हा बँकेत संचालक म्हणून मोलाचे योगदान दिलेले आमदार किरण सामंत यांनी या शेवटच्या वार्षिक सभेला विशेष उपस्थिती लावून सर्व संचालक मंडळ आणि सभासदांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्या शुभहस्ते आमदार किरण सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

प्रमुख उपस्थितांची नोंद

या ४३ व्या वार्षिक सभेला बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, ज्येष्ठ संचालक सुधीर कालेकर, जयंत जालगावकर, रमेश कीर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक अॅड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ संचालक रमेश दळवी, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, अमजद बोरकर, रामभाऊ गराटे, नेहा माने, दिशा दाभोळकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे हजारो सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या यशस्वी आयोजनानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर महाव्यवस्थापक समीर दळवी यांनी सभेचे निवेदन सादर केले.