Ambet Mhapral Bridge: आंबेत-म्हाप्रळ पूल वाहतुकीसाठी तातडीने खुला करा; मंडणगड व्यापारी संघटनेचा प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टीमेटम

आंबेत-म्हाप्रळ पूलदुरुस्ती आणि एसटी बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी; तहसीलदार अक्षय ठाकणे यांना निवेदन सादर

मंडणगड:

Ambet Mhapral Bridge (आंबेत-म्हाप्रळ पूल) तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करावा, तसेच विस्कळीत झालेली राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस सेवा पुन्हा सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी मंडणगड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने तहसीलदार अक्षय ठाकणे यांना निवेदन देण्यात आले. नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून आलेल्या बार्जची धडक बसल्याने पुलाचे नुकसान झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. मात्र, येत्या आठ दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.

व्यापार, शिक्षण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम

रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल केवळ दळणवळणाचा मार्ग नसून मंडणगड व दापोली परिसराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. पूल बंद असल्याने मंडणगड बाजारपेठेतील व्यापार पूर्णपणे मंदावला आहे. याचा थेट फटका स्थानिक व्यापारी, शेतकरी, कामगार, रुग्ण, विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी आणि वाहनधारकांना बसत आहे. तसेच एसटी बस सेवा बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीची भीती

येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या सणासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील विविध भागांतून लाखो चाकरमानी, भाविक व पर्यटक कोकणात दाखल होतात. अशा ऐन सणाच्या काळात पूल बंद राहिल्यास वाहतूक, व्यापार आणि पर्यटनावर अत्यंत गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित शासकीय विभागांनी परस्परांत तातडीने समन्वय साधून पुलाची आवश्यक तपासणी पूर्ण करावी आणि सुरक्षेची खात्री करून पूल लवकरात लवकर वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आंदोलनात स्थानिक संघटनांचा सहभाग

तहसीलदारांना निवेदन देतेवेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक विनोद जाधव, व्यापारी श्रीपाद कोकाटे, प्रवीण जाधव, नीलेश गोवळे, डॉ. करावडे यांच्यासह इतर व्यापारी आणि रिक्षा वाहतूक संघटनेचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 25-07-2026