संगमेश्वर डेपो ते शास्त्रीपूल रस्त्याची दुरवस्था

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता अतिवृष्टीमुळे वाहतुकीसाठी धोका झाला आहे. विशेषतः संगमेश्वर डेपो ते शास्त्रीपूलदरम्यान सुमारे २ किलोमीटर अंतरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. तिथे अपघाताची शक्यता असून, पावसातही सतत वाहतूककोंडी होत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील रस्त्याच्या गंभीर परिस्थितीविषयी आणि आवश्यक उपाययोजना करण्याविषयी शृंगारपूर सरपंच विनोद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तसेच रस्त्याच्या इतर कामांमध्ये असलेल्या त्रुटी त्वरित दुरुस्त करण्यात याव्यात, असेही निवेदनात नमूद केले आहे. महामार्गावर शास्त्रीपूल ते नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातुडों कोंड, निवळी, नेरदवाडी अशा ग्रामीण भागांतील रस्त्यांची व रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंती, गटार यांची सद्यःस्थिती अतिवृष्टीमुळे आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पर्यायी रस्ते नसल्यामुळे अपघात किंवा रस्त्याच्या तुटण्यामुळे मोठे संकट उद्भवू शकते.

या मार्गावरील रस्त्यावर कामे करणाऱ्या ठेकेदारांना व संबंधित खात्यांतील अधिकाऱ्यांना या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची स्थिती पाहावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली आहे. या भागाचा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून, आपल्याकडून तत्काळ याबाबत नियोजन करावे ही अपेक्षा आहे. येथील स्थानिकांच्या जीविताचा मोठा प्रश्न दौऱ्यामुळे सुटू शकतो आणि भविष्यातील आपत्ती टाळता येईल, असे निवेदनात विनोद पवार यांनी नमूद केले आहे.

विद्युतपुरवठाही वारंवार होतो खंडित
संगमेश्वर रस्त्यावरील विद्युतखांव बदलण्यात येत असल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ या खात्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या समस्येचे निराकरण करण्यासाठी कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 02/Jun/2025