कुवारबाव येथे रिक्षा चालकाची दुचाकीस्वाराला दगडाने मारहाण

रत्नागिरी : कुवारबाव येथील रस्त्यावर रिक्षाचालकाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे स्वाराचा ताबा सुटून अपघात झाला. त्याचा जाब विचारणाऱ्या स्वाराला रिक्षा चालकाने दगडाने मारहाण करुन कानाला चावा घेऊन दुखापत केली. शहर पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. लखन चिकोडीकर (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना २७ मे २०२५ रात्री साडेअकराच्या सुमारास कुवारबाव येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सिद्धार्थ मधुकर सुर्वे (वय ३२, रा. कुवारबाव-रत्नागिरी) हे २७ मे रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकी घेऊन रेल्वेस्टेशन नजीक असलेल्या पेट्रोल पंपावर गेले होते. दुचाकीमध्ये पेट्रोल भरुन ते परत घरी जात असताना रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षा चालकाने त्यांना कट मारला. यामुळे सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी स्लिप झाली. याबाबत सिद्धार्थ याने रिक्षा चालकाला जाब विचारला असता झालेल्या वादातून लखन याने सिदार्थ याला दगडाने मारहाण केली. तसेच कानाचा चावा घेऊन दुखापत केली. या प्रकरणी सिद्धार्थ सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 04-06-2025

Physciobot