वाळू वाहतुकीच्या वादातून अल्पवयीन मुलासह वडिलांना मारहाण; चिपळूणमध्ये एकावर गुन्हा दाखल

चिपळूण, दि. ०४ जून २०२५: चिपळूण तालुक्यातील नांदिवसे-गणेशपूर रस्त्यावर वाळू वाहतुकीच्या वादातून एका १३ वर्षीय मुलाला आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना १ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

हसनसाब जलालसाब मुल्ला (वय ३२, रा. खेर्डी, ता. चिपळूण, मूळ रा. देवनगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे १ जून रोजी ट्रॅक्टरमधून वाळू आणण्यासाठी गेले होते. वाळू भरून ते गणेशपूरकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांचा १३ वर्षांचा मुलगा आणि शेजारी राहणारा लक्ष्मण चंद्रकांत चव्हाण हे त्यांना दुपारचा जेवणाचा डबा घेऊन तिथे आले.

याचवेळी आरोपी बाबू जगन्नाथ झोरे (वय ५५, रा. नांदिवसे, धनगरवाडी, ता. चिपळूण) तिथे आला. त्याने रागाने मुलाला “तुझे वडील हसन मुल्ला कुठे आहे, तो मला दाखव” असे विचारले आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर बाबू झोरेने तिथे पडलेला दगड उचलून मुलाच्या छातीवर मारला आणि पोटात जोराने लाथ मारून त्याला खाली पाडले. त्याने आणखी दगड उचलून फेकले असता, त्यापैकी एक दगड मुलाच्या उजव्या पायाला लागून त्याला दुखापत झाली.

वडिलांनाही मारहाण, इतरांना धमकी

ही घटना पाहून फिर्यादी हसनसाब मुल्ला तिथे धावले आणि त्यांनी आरोपी बाबू झोरेला जाब विचारला. तेव्हा बाबू झोरेने त्यांनाही शिवीगाळ करत “तू या ठिकाणी वाळू कशासाठी भरण्यास आला? तुझ्या ट्रॅक्टरमध्ये असलेली वाळू कोणाची आहे?” असे रागाने विचारले. हसनसाब यांनी ट्रॅक्टरमधील वाळू शशिकांत शिंदे यांची असल्याचे सांगितल्यावर बाबू झोरेला आणखी राग आला. त्याने हातात दगड घेऊन हसनसाब यांच्या छातीवर आणि पाठीवर फेकले.

साक्षीदार निजाम मुल्ला भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता, त्यांना आणि साक्षीदार शशिकांत शिंदे यांनाही बाबू झोरेने दगड फेकून मारले, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी हसनसाब मुल्ला यांना किरकोळ शारीरिक दुखापत झाली आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी हसनसाब जलालसाब मुल्ला यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, दि. ०३ जून २०२५ रोजी पहाटे २:५१ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), १२५, १२५(ए), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे आरोपी बाबू जगन्नाथ झोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 04-06-2025