दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दुपारी १२.३० ते ३.३० च्या सुमारास, बांधकाम साईटवरील पाण्याने भरलेल्या एका उघड्या टाकीत पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत काशिनाथ चव्हाण (वय ३२, व्यवसाय-मजुरी, रा. मंदरूप सेवालाल नगर, ता. सोलापूर, जि. सोलापूर) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. श्रीकांत चव्हाण यांचा मुलगा, समीर श्रीकांत चव्हाण (वय ९), हा खेळत असताना दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम साईटवर गेला. ही साईट सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाजूंनी कुंपण घालून बंदिस्त केलेली नव्हती, तसेच तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नव्हती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या उघड्या स्थितीत पावसाचे पाणी भरलेल्या टाकीत समीर पडला. अशा उघड्या टाकीमुळे कोणाचाही मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही, पाण्याच्या टाकीला कोणतेही कुंपण लावून बंदिस्त केले नव्हते. ठेकेदार आरोपी संदीप माधवराव पाटील (रा. विटा, जि. सांगली), ताहिर हुसेन तोफिक कोकणे (रा. मिरज) आणि जग्गू (पूर्ण नाव आणि गाव अज्ञात) हे बांधकामस्थळी उपस्थित नव्हते आणि त्यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्यामुळे समीरचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दापोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०५ आणि ३(५) प्रमाणे गु.र.नं. ११२/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.
बांधकाम साईटवर लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 13-06-2025












