दापोलीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

दापोली, १७ जून २०२५ : दापोली तालुक्यातील जालगाव येथे माहेरून पैशांची मागणी करत सतत छळ केल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पिंकीदेवीचा भाऊ, विरेंद्रकुमार जनार्दन पंडा (वय ३४, रा. ग्राम बलिया, झारखंड) यांनी दापोली पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पिंकीदेवीचे सासरचे लोक तिला वारंवार शिवीगाळ करत होते, धमकी देत होते आणि पैशांची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळून तिने आपले जीवन संपवले.

ही घटना ९ नोव्हेंबर २०२३ ते १३ जून २०२५ या कालावधीत झारखंड येथील नोडीहा गाव आणि दापोलीतील जालगाव येथे घडली.

दापोली पोलिसांनी धर्मेंद्रकुमार धामिन (पती), राजेशकुमार धामिन (दीर), एक महिला (सासू) आणि रामदेव धामिन (सासरे) या चौघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी धर्मेंद्रकुमार आणि राजेशकुमार धामिन हे सध्या दापोलीतील जालगाव येथे राहत आहेत.

या गुन्ह्याची नोंद १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:२८ वाजता करण्यात आली आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 17-06-2025