राजापूर : तालुक्यात रविवारी (ता. १५) रात्रभर पावसाचा जोर होता. मात्र, सोमवारी (ता. १६) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली, तरीही तालुक्यामध्ये पडझड होऊन नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. भू-मधलीवाडी येथील सीता रामचंद्र कुंभार यांच्या घरकुलामध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे, तर नवेदर लोणवीवाडी येथे घरावर झाड पडून, तर अणसुरे भराडेवाडी येथे बंधाऱ्याची झडपे तुटून बंधाऱ्याचे पाणी शेतामधून घुसून शेतीचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांमध्ये तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन घरांची पडझड होऊन, घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले होते. त्यानंतर, गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्यामध्ये ११८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. रस्त्याखालील मोऱ्या आणि साईड गटारे अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आलेले पाणी भू येथील सीता कुंभार यांच्या घरामध्ये शिरले. त्यामध्ये त्यांच्या घरातील फ्रीज, आटाचक्की, भातशेतीला लागणाऱ्या खतांच्या पिशव्या यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अनंत शंकर खानविलकर यांच्या बागेचा गडगा कोसळून बागेचे नुकसान झाले आहे. नवेदर लोणवीवाडी येथे आंबा कलमाची फांदी पडून घराचे नुकसान झाले आहे; मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. देवीहसोळ येथील लिगमवाडी, गुरववाडी येथील रस्त्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामध्ये अणसुरे भराडेवाडी येथील बंधाऱ्याची झडपे तुटून बंधाऱ्यांचे पाणी शेतामध्ये घुसून शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते. मात्र, नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही.
मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात एक बैल (पाडा) वाहून जात असल्याचे जैतापुरातील चव्हाटा वाडीजवळ स्थानिकांनी पाहिले. खाडीतील हा पाण्याचा प्रवाह अतिशय जोरदार असतानाही जैतापूर चव्हाटावाडीतील तरुण सागर करंगुटकर व साईल भाटकर यांनी जीवाची बाजी लावत या पाड्याला वाचवताना सुखरूप किनाऱ्यावर आणले. त्याला चव्हाटा मंदिर परिसरात विश्रांतीसाठी ठेवण्यात आले होते.
या पाड्याची तब्येत काहीकाळ गार पाण्यात राहिल्यामुळे अस्वस्थ बनली होती; परंतु स्थानिकांनी त्याची वेळीच काळजी घेतल्याने तो सुखरूप आहे. या पाड्याचे मालक जैतापूर येथील रिजवान काझी असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला त्यांच्याकडे देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 17/Jun/2025














