रत्नागिरी : जिल्ह्यातील चार फार्मसी महाविद्यालयांची ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ तपासणी करणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चार फार्मसी महाविद्यालयांची आता ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ तपासणी करणार आहे. गुणवत्तेचा निकष लावून महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले महाविद्यालय निवडीसाठी याचा फायदा होईल, अशी माहिती सावर्डे येथील फार्मसी कॉलेजचे प्रवीण वाघचौरे यांनी दिली.

ते म्हणाले, शासनाच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात फार्मसी महाविद्यालयांची संख्या वाढलेली आहे; परंतु काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना प्रलोभने देऊन त्यांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल होत आहेत. त्या अनुषंगाने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने देशपातळीवर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाशी करार केला आहे. राज्यभरात बी. फार्मसीची ५५० महाविद्यालये असून, प्रवेशक्षमता ४८ हजार तर डी. फार्मसीची ६७५ महाविद्यालये असून, ४१ हजार जागा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, देवरूख, खेड आणि रत्नागिरी येथे फार्मसीची ४ महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेशक्षमता २५० आहे. क्रमवारी निश्चितीसाठी नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिंग फ्रेमवर्कचा (एनआयआरएफ) वापर केला जात होता. त्यात बदल करून आता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून फार्मसी महाविद्यालयांची रैंकिंग केली जाणार आहे.

क्रमवारी निश्चितीचे निकष
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेली कौशल्ये, शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, प्रयोगशाळा, वातावरण, ग्रंथालय, नोकरीसाठी तयारी, शिक्षकांचे प्रमाण, संशोधन आणि विद्यार्थी प्रगती अशा विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाणार असल्याचे प्रवीण वाघवचौरे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 25/Jun/2025

Gadre2