चिपळुणात मारुती चितमपल्ली यांना आदरांजली

चिपळूण : पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांतर्फे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना आदरांजली वाहण्यात आली. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, ग्लोबल चिपळूण टुरिझम आणि अॅक्टिव्ह ग्रुप यांच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आदरांजली सभा झाली. चितमपल्ली यांची आठवण आणि त्यांच्या विचारांची पेरणी ही नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, ही भावना कार्यक्रमात वारंवार व्यक्त झाली.

माजी नगरसेवक रामशेठ रेडीज यांनी धामणवणे जंगलातील त्यांच्या सहवासाच्या आठवणी सांगितल्या. पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर म्हणाले, मारूती चितमपल्ली यांनी जंगलात राहून, मिसळून जे लिखाण केलं ते केवळ साहित्य नव्हे तर ती एक सजीव अनुभूती आहे. त्यांच्या लेखनाला शास्त्राचा आधार आहे का, असा प्रश्नच चुकीचा आहे. चितमपल्ली यांच्या साहित्याविषयी बोलताना वाटेकर म्हणाले, ते निसर्गात राहिले, जंगलाशी नातं जोडले.

त्यांच्या लेखनावर अनेकदा टीका झाली; पण त्यांनी कधीही मार्ग सोडला नाही. विलास महाडिक यांनी २०२३ मध्ये सोलापूरमधील चितमपल्ली यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. श्रद्धांजली सभेला साहित्यिक व अभ्यासक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष कवी अरूण इंगवले, रामशेठ रेडीज, सीमा चाळके आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 25/Jun/2025