मुंबई: टेलिव्हिजन विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका वाहिनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ही मालिका बंद न होता डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीव्हीवरील प्रसारण थांबल्यानंतर आता ही मालिका युट्यूबवर दाखवली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का बसला असून, मालिकेत सावित्रीबाईंची मुख्य भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
मधुराणी प्रभुलकरची एक्झिट; क्षमा देशपांडे साकारणार ‘सावित्रीबाई’
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा आणि संघर्षाचा धगधगता इतिहास या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जात आहे. या मालिकेत खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत होते.
वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मधुराणी प्रभुलकरने देखील या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता युट्यूबवर सुरू होणाऱ्या या प्रवासात मधुराणी प्रेक्षकांना दिसणार नाही. तिच्या जागी आता मालिका विश्वातील परिचित चेहरा, अभिनेत्री क्षमा देशपांडे हिची एन्ट्री झाली असून ती सावित्रीबाई फुले यांची आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
स्टार प्रवाहवरील प्रसारण बंद; ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर नवा प्रोमो रिलीज
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका आधी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर प्रसारित केली जात होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे चॅनेलने ही मालिका अचानक बंद केल्याने शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
आता ही मालिका टीव्हीवरून थेट मराठी वारसा या युट्यूब चॅनेलवर स्थलांतरित करण्यात आली आहे. या डिजिटल प्रवासाचा पहिला अधिकृत प्रोमो देखील सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री क्षमा देशपांडे सावित्रीबाईंच्या खंबीर आणि प्रभावी भूमिकेत नजर येत आहे.
आठवड्यातून दोन दिवस प्रेक्षकांच्या भेटीला; वेळ आणि दिवस निश्चित
टीव्हीचा पडदा सुटला असला तरी डिजिटल विश्वाच्या माध्यमातून ही ऐतिहासिक मालिका जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेचे नवीन भाग दर बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी ६:३० वाजता युट्यूबवर प्रसारित केले जातील. चॅनेल बदलले आणि मुख्य अभिनेत्री बदलली असली, तरी इतिहासाचा हा सुवर्णकाळ प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 19-06-2026














