गुहागरमध्ये ३५ लाखाच्या कामाला स्थगिती; डॉ. विनय नातू यांचा आरोप

गुहागर : मत्स्य व्यवसाय विकासाची अधिक कामांची तरतूद ही ठराविक तालुक्यांमध्येच करण्यात आली आहे. तसेच गुहागरमध्ये ३५ लाखाच्या एकमेव कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असतानादेखील त्याला स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोप माजी आ. डॉ. विनय नातू यांनी केला असून मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे हा विषय मांडून येथील मत्स्य विकासाचा अनुशेष कसा भरुन काढता येईल, याकडे लक्ष वेधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मासेमारी बंदराच्या विकासासाठी सर्वेक्षण/सुधारणा व मच्छिमार बंदराचा विकास करणे या योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये कोणती कामे मंजूर झाली व ३१ मार्च २०२५ अखेर किती निधी खर्च झाला याविषयी रत्नागिरी पतन अभियंत्यांकडून डॉ. नातू यांनी मत्स्य विभागाचा आढावा घेतला असता ठराविक तालुक्यांमध्येच या कामाच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात सर्वाधिक मच्छिमार समाज असून रत्नागिरी तालुक्यात ३० हजार, दापोली तालुक्यात १४ हजार, गुहागर तालुक्यात १४ हजार तर राजापूर तालुक्यात १० हजार याप्रमाणे मच्छिमारांची लोकसंख्या आहे.

जिल्ह्यातील मच्छिमारांच्या लोकसंख्येनुसार, सर्वात जास्त मासळी उतरविण्याची ठिकाणे रत्नागिरी तालुक्यात २० आहेत. गुहागरमध्ये १२, दापोलीत ६ आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही ठिकाणे असताना या सर्वांच्या विकासाचा केंद्रबिंदू सर्व तालुके असले पाहिजेत, असे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी तालुक्यात पावणे चार कोटीची कामे, राजापूर तालुक्यात सव्वा कोटी, दापोलीमध्ये २ कोटी तर गुहागरमध्ये १ कोटी कामे आहेत. यामध्ये गुहागरमधील एका ३५ लाखाच्या कामाला महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारमधील एका शिकलेल्या स्थगिती सम्राटाने या मंजूर झालेल्या प्रशासकीय कामाला स्थगिती दिली व हे काम थांबविले गेले असल्याचा आरोप डॉ. नातू यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 26/Jun/2025

Hotel waiter