राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गावरील दुतर्फा वाढलेल्या झाडीचा वाहनचालकांना त्रास

राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि रस्त्यावर लोंबकळणारी चिवारी यामुळे मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे. लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि चिवारी तत्काळ हटवल्या जाव्यात, अशी मागणी पूर्व परिसरातून केली जात आहे.

दरवर्षी या संपूर्ण मार्गावर ही समस्या पाहावयास मिळते. मार्गावरील लगतची वाढलेली झाडी आणि काही ठिकाणी लोंबणाऱ्या चिवारी यांचा ये जा करणाऱ्या वाहनांना त्रास होत असतो. लोंबणाऱ्या चिवारीची आपटून अनेक वाहनांच्या काचा फुटल्याचे प्रकार घडले आहेत. या पावसाळ्यात देखील तसे प्रकार घडत आहेत. दुचाकीस्वारांची अवस्था तर अधिक बिकट होताना दिसतेय. बाईक चालवताना रस्त्याकडे बघायचे का रस्त्यात लोंबणाऱ्या चिवारीकडे बघायचे अशी द्विधावस्था त्यांची होत आहे. शिवाय रस्त्यात पडलेले खड्डे यातून मार्ग काढताना त्यांना नाकीनऊ येत आहेत. दरवर्षी ओणी अणुस्कुरा मार्गांवर अशी स्थिती निर्माण होते. मात्र संबंधीत विभाग त्याकडे वेळीच लक्ष देताना दिसत नाही.

या मार्गांवर बऱ्याच ठिकाणी रस्त्या लगतच्या झाडांच्या फांद्या एवढ्या खाली वाकल्यात की मोठ्या वाहनांना त्याचा अडथळा ठरत आहे. यामध्ये ओणीपासून सौन्दळ, खडीकोळवण, रायपाटण, आदी भागात रस्त्यावर लोंबणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि चिवारीची बेटे प्रामुख्याने आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी देखील वाढू लागली आहे. समोरासमोरून अचानक आलेल्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही. एखादा गंभीर प्रसंग घडल्यावरच संबंधित विभाग लक्ष देणार आहे कां? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 26/Jun/2025

Gadre3