तेलाची फोडणी महागली !

रत्नागिरी : ऐन सणासुदीच्या काळामध्येच खाद्यतेलाचे दर भडकल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. आयात करात २० टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वच खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलो वाढ झाली आहे. मोठ्या बाजारात तर तेलाचे दर स्थिर होईपर्यंत विक्री थांबवण्यात आली आहे. याबरोबरच खोबऱ्याचा दरही १३५ रुपयांवरून १५० रुपये किलो झाला आहे. या सप्ताहात खोबऱ्याचा दर दहा ते पंधरा रुपयांनी वाढला आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात कर वाढविल्याने तत्काळ सांगलीच्या बाजारात तेलाचे दर वाढवण्यात आले. सरकी तेलाचे दर प्रति किलो ११४ वरून तत्काळ १३४ रुपये करण्यात आले आहेत. सरकी तेल डव्याचा दर (१५ किलो) १७४० वरून आता २००० रुपये झाला आहे. सूर्यफूल १२० रुपये किलोवरून १४० रुपये झाला आहे. डब्याचा दर १७०० वरून दोन हजार रुपये झाला आहे. हा दर शनिवार दि. १४ पासून लागू करण्यात आला आहे.

या सप्ताहात खोबरे वगळता इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात रवा, मैद्याच्या किरकोळ दरात प्रति किलो पाच रुपयांनी वाढ झाली होती. गव्हाचे दर ३ हजार २०० ते ४ हजार १०० रुपये क्विंटल झाले आहेत. हरभरा डाळ क्विंटलला ९ हजार ५०० ते ९ हजार ६०० रुपये आहे. किरकोळ विक्री १०५ ते १०८ रुपये किलो आहे. साखरेचा क्विंटलचा दर ३ हजार ९०० ते ४ हजार रुपये आहे. साबुदाण्याचा किरकोळ विक्री दर आता ७० रुपये किलो झाला आहे. किराणाच्या इतर साहित्याचे दर मात्र स्थिर आहेत. तांदूळ ४५ ते २५०, गूळ ७० ते ८५, रवा ४५ ते ४८, मैदा ४५ ते ४८, साखर ४२ ते ४५, तूरडाळ १९० रुपये किलो आहे.

दर वाढवून ग्राहकांना आर्थिक फटका देण्यात आला आहे. आता दोन महिने सलग सणांचे आहेत. यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. खाद्यतेलाचे दर पूर्ववत करून, ग्राहकांना दिलासा द्यावा.- सेजल पवार, रत्नागिरी.