Ratnagiri: ‘जिंदल’ला दिलेला ‘तो’ दाखला बनावट ?

रत्नागिरी : नांदिवडेचे ग्रामस्थ जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिनलविरोधात अनेक दिवस लढा देत आहेत. गेल्या महिन्यात जयगड येथे झालेल्या बैठकीत जिंदल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ना हरकत दाखला मिळाल्याचे सांगितले होते; पण त्या ना हरकत दाखल्याची चौकशी केली असता त्या दाखल्यावर जावक क्रमांक नाही, ठरावाची तारीख नाही आणि त्याचा दफ्तरात कुठेही नोंद नसल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांनी केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देत या कथित ना हरकत दाखल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

अॅड. स्वप्नील पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ९ जून २००६चा कथित ना हरकत दाखला जेएसडब्ल्यू एनर्जी आणि जेएसडब्ल्यू ब्राह्मी बंदर यांच्यासाठी दाखवण्यात येत आहे; मात्र या दाखल्याची कोणतीही अधिकृत नोंद सापडली नसल्याची तक्रार अॅड. पाटील यांनी केली आहे. हा दाखला बनावट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. संबंधित ना हरकत दाखल्याची सखोल चौकशी करा, अशी मागणी यावेळी केली. हे प्रमाणपत्र खोटे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, गॅस टर्मिनल तत्काळ स्थलांतरित करावे, जिंदल कंपनीने स्थानिक ग्रामस्थांचे शेती, मच्छीमारी आणि फळबाग यांची नुकसानभरपाई द्यावी. चौकशीचा संपूर्ण अहवाल १५ दिवसांत आम्हाला द्यावा, अशी मागणी अॅड. स्वप्नील पाटील यांनी केली आहे.

२००६ ला दाखला दिल्याचे कंपनीचे म्हणणे
ग्रुप ग्रामपंचायत नांदिवडेने ९ जून २००६ ला हा ना हरकत दाखला दिल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये मे जेएसडब्ल्यू एनर्जी (रत्नागिरी) (औष्णिक वीजनिर्मिती) जयगड व मे जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड लॉजिस्टिक लि. (बारमाही बंदर) धामणखोल, जयगड या कंपनीला वीजनिर्मिती प्रकल्प आणि बारमाही बंदर सुविधा उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कसलीही हरकत नाही करिता ना हरकत दाखला दिला आहे, असा दाखला दिल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु १९ वर्षांपूर्वी दिलेला हा दाखला बनावट आणि खोटा असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 18/Jul/2025