रत्नागिरी, १७ जुलै : रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त झाला आहे, ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्याने देशात सुवर्णगटामध्ये (Golden Category) आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार रत्नागिरीच्या ‘हापूस आंब्या’च्या उत्पादनामुळे मिळाला आहे, ज्याचा उल्लेख केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेषत्वाने केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या स्वप्नातून ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक जिल्ह्यातून एका उत्पादनाची निवड करून त्याला प्रोत्साहन देणे, ब्रँडिंग करणे, ज्यामुळे संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल आणि देशाची सामाजिक व आर्थिक वाढ साधता येईल.
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत देशातील ५८७ जिल्ह्यांनी नामनिर्देशन केले होते. राष्ट्रीय स्तरावरील भौतिक पडताळणीमध्ये भारतातून १४१ जिल्ह्यांची निवड झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश होता. यात नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होता.
रत्नागिरी जिल्ह्याच्या ‘हापूस आंबा’ उत्पादनाशी संबंधित उद्योगांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सह व्यवस्थापक, श्री. ताशी डोर्जे शेर्पा यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी काही आंबा उत्पादक शेतकरी तसेच पावस येथील देसाई प्रॉडक्ट्स आणि श्री. भिडे यांचे योजक असोसिएट्स या उद्योगांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी ODOP बाबत समर्पक आणि सविस्तर सादरीकरण केले होते.
‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) पुरस्कार २०२४’ चा वितरण सोहळा १४ जुलै २०२५ रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीम. रेखा गुप्ता आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री ना. श्री. जितीन प्रसाद हे उपस्थित होते.
या यशामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत आणि महसूल राज्यमंत्री ना. श्री. योगेश कदम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे, असे जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले. या मान्यवरांनी रत्नागिरी जिल्ह्याचे विशेष अभिनंदनही केले आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या पुरस्काराबद्दल पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी, शेतकरी, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि रत्नागिरीवासियांचे अभिनंदन केले आहे.
या पुरस्कारामुळे रत्नागिरी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख, उत्पादनासाठी नवीन बाजारपेठांची उपलब्धता, उद्योग आणि कारागिरांना रोजगार व प्रशिक्षण, तसेच पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.













