रत्नागिरी, १८ जुलै : महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या या १२ किल्ल्यांना ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या अंतर्गत जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे, हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने राज्यातील १२ किल्ले प्राथमिक स्वरूपात निवडून त्यांचा जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला होता, जो पुढे युनेस्कोकडे पाठवण्यात आला. या निवडक किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, राजगड, लोहगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, रायगड, खांदेरी या ११ किल्ल्यांचा समावेश असून, तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचाही यात समावेश होता.
ही संपूर्ण प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू होती आणि २०२० ते २०२५ या काळात तिला गती मिळाली. सुरुवातीला या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून युनेस्कोकडे सादर करण्यात आला.
सविस्तर प्रकल्प अहवालाचा अभ्यास करून किल्ल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये आयकॉमोस तज्ञांची समिती भारतात किल्ल्यांच्या तपासणीसाठी पाठवली होती. प्रोफेसर श्री. ली यांनी या १२ किल्ल्यांची पाहणी केली आणि प्रत्येक किल्ल्याशी संबंधित स्थानिक समुदायांशीही चर्चा केली. प्रोफेसर ली यांनी २ ऑक्टोबर २०२४ रोजी सुवर्णदुर्ग किल्ल्यालाही भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याबाबतची सविस्तर माहिती आणि तेथे करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती या तज्ञांना सादरीकरणाद्वारे दिली होती. सुवर्णदुर्ग किल्ला परिसरात सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि सध्याचे एस.डी.ओ. डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३-४ वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
यावर्षी २०२५ मध्ये युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या ४७ व्या अधिवेशनात २१ देशांच्या सदस्यांपैकी जवळपास १९ देशांच्या सदस्यांनी मतदान करून एकमताने या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.
यामुळे देश-विदेशातील अनेक पर्यटक या किल्ल्यांना भेटी देतील, ज्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची संधी आहे आणि किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद जागतिक वारसा स्थळ” म्हणून जगाच्या नकाशावर झाली आहे, जे रत्नागिरी जिल्हावासीय, महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.













