रत्नदुर्ग किल्ल्यावरील ‘त्या’ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मनसेची मागणी

रत्नागिरी : शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पेठकिल्ला गावातील एका टेहळणी बुरुजामध्ये अनधिकृत बांधकाम आहे. त्यासाठी पालिकेकडून स्ट्रीट लाईट, चेकर्सटाईल्स अशी सोय देण्यात आल्या आहेत. बुरुजालागत पालिकेचे आरक्षण असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करून जागा बळकवण्याचा गंभीर प्रकार घडला आहे, असे आरोप करत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी निवेदनामार्फत मनसेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नदुर्ग किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामे काही लोकांच्या आशीर्वादानेच झाली आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक शौचालयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याबाबत तेथील स्थानिक जनतेने प्रशासनाला अनेकवेळा पालिका प्रशासनाला अवगत केले आहे. त्यावर पालिकेकडून फक्त चालढकलच करण्यात येते. मुळात पालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्याना नोटीसदेखील काढली होती; पण कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पालकमंत्र्यांनीही अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर तिथे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसल्याचे उत्तर दिले आहे. याचा अर्थ पालिका प्रशासन फक्त जनतेलाच नव्हे, तर खुद्द पालकमंत्री महोदयांचीदेखील फसवणूक करत आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत हस्तक्षेप करून ते अनधिकृत बांधकाम हटवावे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या व दुर्लक्ष करून खोटी माहिती देणाऱ्या पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांवर खात्याअंतर्गत कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक जनतेसह रस्त्यावर उतरेल, असा इशारादेखील दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 22/Jul/2025