रत्नागिरी : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या पुनर्रचनेबाबत राजापूर तालुक्यातील १३ हरकती दाखल झाल्या आहेत.
राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट तसेच बारा पंचायत समिती गणांच्या रचनेनंतर एकूण १३ हरकती दाखल झाल्या असून त्यामध्ये सर्वाधिक बारा हरकती पाचलमधून तर एक हरकत देवाचे गोठणे येथून दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी अस्तित्वात असलेले सहा गट आणि बारा पंचायत समिती गण ही संख्या कायम ठेवण्यात आली आहे. चार पंचायत समिती गण पूर्वीच्याच नावाने ठेवण्यात आले असून उर्वरित आठ पंचायत समितीच्या गणांसह सहा गटांची नावे बदलून ते नवीन नावाने अस्तित्वात आले आहेत. या गट आणि गणांच्या पुनर्रचनेबाबत आजपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाचलमधून एकूण बारा तर देवाचे गोठणे येथून एक अशा तेरा हरकती येथील तहसील कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत.
यापूर्वी पाचल जिल्हा परिषद गट होता. त्याऐवजी नव्या रचनेत त्याचे नाव बदलून तळवडे गट करण्यात आले आहे. त्याला हरकती घेण्यात आल्या आहेत. त्या गटाचे नाव पाचल करावे, यासाठी पाचल ग्रामपंचायतीसह गावचे सरपंच बाबालाल फरास, ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे, विनायक सक्रे, पूजा शिगम, चैतन्य पाथरे, शंकर वसंत पाथरे, ओंकार ताम्हनकर, विशाल भिंगार्डे, किशोर शिवराम नारकर, राजेंद्र रेडीज, सिकंदर फरास यांनी हरकती घेतल्या आहेत. गोवळ गाव पूर्वी देवाचे गोठणे पंचायत समिती गणात होते ते आता धोपेश्वर गणात घेण्यात आले आहे. त्यावर मराठे यांची हरकत आहे. आडिवरे, वाडापेठ ही गावे भालवली पंचायत समिती गणात समाविष्ट व्हावीत, याबाबतदेखील मराठे यांची हरकत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 22-07-2025














