मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी सुरळीत करण्याची मागणी

संगमेश्वर : गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण मानला जातो. या उत्सवासाठी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गावाला येतात. मात्र अतिवृष्टी आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे सध्या या महामार्गाची चाळण झाली आहे. खड्यांमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग सुस्थितीत करावा, अशी विनंती धामणी येथील युवा कार्यकर्ते सचिन यादव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री, आमदार व सर्व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.

यादव यांनी पुढे म्हटले आहे की, गणेशोत्सवापूर्वी लोकप्रतिनिधींनी सर्व विभागांची बैठक घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुवस्थेबाबत चर्चा करावी. महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून टाकावी तसेच महावितरणने गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडित न करता तो सुरळीत चालू ठेवावा, अशा सूचना सर्व विभागांना द्याव्यात. गणेशोत्सव जवळ आला असून हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपल्या गावी स्वतःच्या वाहनाने किंवा एस. टी. बसेस आणि खासगी वाहनांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने येत असतात. परंतु, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाला नियुक्त ठेकेदारांच्या केलेल्या निष्क्रियतेमुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यात काही ठिकाणी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. फक्त काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील रस्त्याची कामे संथगतीने सुरू आहेत. ती जलद होण्यासाठी अधिकारी, ठेकेदार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एक संयुक्त बैठक तातडीने घ्यावी, अशी विनंती यादव यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 25/Jul/2025

Ratnagiri Khabardar add image