रत्नागिरी : श्री तृणबिंदुकेश्वर मंदिरात संततधार रुद्रानुष्ठान सुरू

रत्नागिरी : पवित्र श्रावण महिन्याला कालपासून सुरुवात झाली. झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी-तृणबिंदुकेश्वर मंदिरातील श्री तृणबिंदुकेश्वराच्या पिंडीवर संततधार रुद्रानुष्ठानही सुरू झाले. या वेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली.

श्री तृणबिंदुकेश्वराची स्थापना करणाऱ्या मुळ्ये नामक व्यक्तीच्या वंशजांनी संततधारेची परंपरा सुरू केली. श्री तृणबिंदुकेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रामधून पाण्याची संपूर्ण महिनाभर संततधार सुरू असते व ब्रह्मवृंद येथे रूद्रपठण करतात. कालपासून या अनुष्ठानाला प्रारंभ झाला.

रत्नदुर्ग किल्ला विजापूरच्या सुभेदाराच्या ताब्यात असताना चिटणीस म्हणून मुळ्ये नामक व्यक्ती काम करत असे. मुळ्ये यांच्या वंशजांनी संततधारेची परंपरा सुरू केली. त्यांचे गोखलेनाक्यावर भाजीचे दुकान होते. श्रावण महिन्यानिमित्त श्री देव भैरीच्या मूर्तीलाही विविध प्रकारच्या फुलापानांनी व आकर्षक सजावटीने सजवण्यात येत आहे. दररोज ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदुकेश्वराचे दर्शन घेऊनच नोकरीधंद्याला जाणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे.

गेली अनेक वर्षे ही प्रथा अखंडितपणे सुरू आहे. श्रावण प्रतिपदा ते अमावास्या या काळात श्री तृणबिंदुकेश्वरावर संततधार रुद्रानुष्ठान केले जाते. रुद्रानुष्ठान काळात दररोज बेल, फुले, फळांची आरास केली जाते. संततधारेकरिता भाविक, दानशूर मंडळींचेही सहकार्य लाभते. संततधारेचे तीर्थ प्राशन करणाऱ्या अनेक भाविकांना चांगली प्रचिती आली असून, यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे-मुन्नाशेठ सुर्वे, अध्यक्ष, श्री भैरी देवस्थान ट्रस्ट

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 26/Jul/2025