रत्नागिरी : वाटद खंडाळा (ता. रत्नागिरी) येथील श्रीमती पार्वती शंकर बापट काशिनाथ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विविध कायद्यांबाबत साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील, महाविद्यालय संस्थेचे उपाध्यक्ष आढाव, सचिव बोरकर, मुख्याध्यापक जगताप यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व लोकअभिरक्षक कार्यालयातील वकील उन्मेष मुळ्ये उपस्थित होते.
पाटील यांनी आपल्या मनोगतात बालकांविषयी असलेल्या कायदेविषयक तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. बाल न्यायमंडळ, जिल्हा बालकल्याण समितीचे कार्य, विधी संघर्षित बालक, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांविषयी तरतुदींची तसेच बालंकावरील अन्याय, अत्याचार निवारण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बालकांसाठी विधी सेवा पुरविणारे पथक स्थापन झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत जातीभेद न पाळण्याची व धार्मिक विद्वेष न वाढविण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असल्याचे कथन केले.
यावेळी अॕड. मुळ्ये यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणात बालकांबाबतच्या योजनेविषयी मुलांना माहिती दिली. तसेच बालकांचे हक्क, शिक्षणाचा हक्क यांविषयी मुलांना मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 26-07-2025














