राजापूर : सोलगावमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रानभाज्या महोत्सव

राजापूर : पावसाळ्याच्या दिवसांत कोकणामध्ये नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या आणि शरीरासाठी पौष्टिक असलेल्या रानभाज्यांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असतो. या रानभाज्यांची माहिती सर्वांना व्हावी या हेतूने राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर तालुक्याच्या रास्त दर धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष महेश नकाशे आणि पत्रकार राजेंद्र बाईत उपस्थित होते. या कार्यक्रमात रानभाज्यांपासून बनविलेल्या विविध रेसिपींच्या दालनाचे प्रदर्शन करण्यात आले. प्रारंभी माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली गेली. त्यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सहायक शिक्षक उमेश गमरे उपस्थित होते.

त्यानंतर रानभाजी प्रदर्शन आणि त्यापासून बनवलेल्या विविध रेसिपींच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध रानभाज्यांच्या रेसिपींचा समावेश होता.

प्रदर्शनात ‘सुरणाच्या वड्यांची’ बाजी
या रानभाजी प्रदर्शनातून सर्वोत्तम रानभाजी ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक वेदिका व कुणाल विजय बाणे यांनी तयार केलेल्या सुरणाच्या वड्यांना मिळाला. द्वितीय क्रमांक श्रावणी मोहन मांडवकर हिच्या वांवगडच्या पानांच्या भजीला आणि तृतीय क्रमांक हर्षल विनायक शेलार याच्या मायाळूची भाजी व तुषार सुरेश जोशी याच्या अळंबीच्या भजीला देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 26/Jul/2025