वाटद (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज एमआयडीसी समर्थनार्थ एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत, वाटद एमआयडीसीच्या समर्थनार्थ आपला कौल दिला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शेतकरी, जमीन मालक आणि व्यापारी यांच्या ‘वाटद एमआयडीसी जनप्रबोधन सभेत’ विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
प्रदूषणविरहित आणि रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प
उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले की, ते कोणत्याही सभेमुळे नव्हे, तर शेतकऱ्यांच्या विनंतीमुळे आणि मतदारसंघाचा आमदार म्हणून येथे आले आहेत. बाहेरच्या व्यक्तींपेक्षा त्यांना आपल्या घरच्या माणसांचे नुकसान होऊ नये याची जास्त काळजी आहे. ते म्हणाले की, “काही लोक बॉम्ब किंवा दारूगोळ्याचा कारखाना येणार असल्याचा गैरसमज पसरवत आहेत. पण वाटदमध्ये येणारा हा कारखाना आपल्या सैन्यासाठी शस्त्र बनवणारा आहे. ज्या बंदुका आपल्या सैनिकांच्या हातात असतील, पाकिस्तानला हरवण्यासाठी जी शस्त्रे वापरली जातील, ती आपल्या वाटद एमआयडीसीमध्ये बनणार आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
वाटद गावातील ४०% घरे रिकामी असून, तेथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जात असल्याचे सांगत, सामंत यांनी प्रदूषणविरहित कारखाना आणून तरुणांना त्यांच्या आई-वडिलांसमोरच नोकरी देण्याची ग्वाही दिली. स्टरलाईट आंदोलनाचा दाखला देत, सामंत यांनी सांगितले की, स्टरलाईट हा रासायनिक कारखाना होता, तर वाटद येथे येणारा हा संरक्षण क्षेत्रातील (डिफेन्स) प्रकल्प आहे, जो पूर्णपणे प्रदूषणविरहित असेल.
शेतकरी हित जपले जाईल: मंत्री सामंतांची ग्वाही
उद्योगमंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याची पूर्ण हमी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, एमआयडीसीसाठी कोणतीही धार्मिक स्थळे (मंदिरे, मशिदी) किंवा घरे संपादित केली जाणार नाहीत. तसेच, शेतीची काठावरची जमीनही घेतली जाणार नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक जमिनीचा भाव वाटद एमआयडीसीमध्ये असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. रोजगाराच्या बाबतीत एमओयूच्या (MoU) पलीकडे जाऊन कंपन्यांना दिलेली वचनबद्धता पूर्ण करण्यास भाग पाडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“शेतकरी हा माझा केंद्रबिंदू आहे. त्यांच्यात गैरसमज पसरवला जाऊ नये यासाठी मी इथे आलो आहे,” असे सामंत म्हणाले. जे लोक विरोध करत आहेत, त्यांचीदेखील समजूत काढण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी एक हजार एकर जागा घेतली जात असली तरी, प्रत्यक्ष प्रकल्प केवळ ३०० एकरवरच उभारला जाईल आणि उर्वरित जागा ‘बफर झोन’ (Buffer Zone) म्हणून वापरली जाईल. जमीन एमआयडीसीकडून थेट संपादित न करता, कंपन्यांच्या पैशाने ‘पास थ्रू’ (Pass Through) पद्धतीने घेतली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल.
प्रशिक्षण केंद्र आणि स्थानिकांना प्राधान्य
मेळाव्यात सामंत यांनी वाटदच्या ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्याची घोषणा केली:
- गावातील वस्तीची ठिकाणे आणि राहती घरे वगळण्यात येतील.
- धार्मिक स्थळे, वस्तीची ठिकाणे, मार्ग आणि नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत (विहिरी, नळपाणी योजना) संपादित केले जाणार नाहीत.
- प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल, ज्यामुळे स्थानिकांना प्रकल्पात रोजगार मिळेल.
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्यानुसारच उद्योगधंदे येतील.
- जमिनीला योग्य मोबदला मिळेल.
- प्रकल्पग्रस्तांना (PAP) दोन गुंठे जमीन उद्योगासाठी परत दिली जाईल. महाराष्ट्रातील एक गुंठा जमिनीच्या नियमात बदल करून, वाटद एमआयडीसीसाठी दोन गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात निवडली येथे येणाऱ्या सौर ऊर्जा पॅनेलचे सेल बनवणारे आणि युद्धात वापरले जाणारे ड्रोन बनवणारे प्रकल्प (प्रत्येकी १५०० कोटी आणि ३००० कोटी रुपयांचे) हे देखील देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे प्रकल्प असल्याचे सामंत यांनी नमूद केले. या प्रकल्पांमुळे स्थानिकांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“तुमचे नुकसान होणार नाही याची दक्षता माझ्याकडून घेतली जाईल. हा प्रकल्प आल्यानंतर चार वर्षांनी तुम्हीच म्हणाल की वाटदमध्ये मोठी औद्योगिक क्रांती झाली आहे,” असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यामुळे वाटद एमआयडीसीच्या समर्थकांनी मोठी ताकद दाखवली असून, आता विरोधकांची पुढील भूमिका काय असेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













