दुर्गम ग्रामीण भागातील शाळांकडे लक्ष द्या : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकत्र करून समूह शाळांची संकल्पना राबवण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पट असलेल्या राज्यातील सुमारे १८ हजार तर रत्नागिरी जिल्ह्यातील हजारांहून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील वाडीवस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचा मूळ हेतू हरवणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी, असे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शाळांबाबत शासनस्तरावरून घेण्यात येणाऱ्या निर्णयावर अॅड. पाटणे म्हणाले, मराठी शाळांचे खच्चीकरण आणि इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण खेड्यापाड्यातही पोहोचलेले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मराठीला स्पर्श न करता विद्यार्थी अंतिम पदवीपर्यंत पोहोचू शकतो, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. सुमारे ८६ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाला पसंती दिल्यामुळे मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण झालेली आहे. त्यात ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या या शाळा कमी झाल्या तर त्यात आणखी भर पडणार आहे. याचा शासनाने विचार करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी पायपीट करावी लागते. याचा विचार कुठेतरी शासनाने करणे आवश्यक आहे अन्यथा ग्रामीण भागातील त्या मुलांवर अन्याय होईल, अशी भीतीही आहे.

मराठीची सक्षमतेकडे वाटचाल
मराठी अधिकाधिक सशक्त होऊन ज्ञानभाषा झाली तरच ती इंग्रजीशी टक्कर घेऊ शकेल. भाषा जेव्हा प्रवाही बनते तेव्हाच ती सक्षमतेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू करते. सध्या मराठीला अभिजात दर्जा मिळाला हेच समाधान आहे, असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 31/Jul/2025