दापोली : दापोली तालुक्यातील फणसू गावातील १६ वर्षीय मनस्वी महेश बेर्डे हिचा दुचाकी अपघातानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी घडली असून, 27 जुलै रोजी मुंबईत तिच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनस्वी ही आपल्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत एमएच 03 ईडी 4668 क्रमांकाच्या ऍक्टिवा दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडीवरून खाली पडली. अपघातात तिच्या मांडीला, पायाला, गुडघ्याला आणि पोटाला गंभीर मार लागला.
प्राथमिक उपचारासाठी तिला तातडीने दापोलीतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून पुढील उपचारासाठी म्हात्रे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू असताना, 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6.50 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या अपघातानंतर सुरू झालेली उपचारांची शर्थ अखेर निष्फळ ठरली.
या प्रकरणी मनस्वीच्या अपघाती मृत्यूची नोंद 31 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6.57 वाजता दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे फणसूर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 01/Aug/2025














