Chipi Airport Sindhudurg: दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी-नवी मुंबई विमानसेवा आजपासून सुरू!

Chipi Airport Sindhudurg: दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी-नवी मुंबई विमानसेवा आजपासून सुरू!

आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणाऱ्या या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गातील पर्यटन आणि रोजगाराला मिळणार नवी भरारी; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग: Chipi Airport Sindhudurg येथील गेल्या दोन वर्षांपासून खंड पडलेल्या मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेला आता पुन्हा अधिकृतपणे सुरुवात होत आहे. चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी नियमित विमानसेवा पुन्हा सुरू होत असून, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणारे पहिले विमान चिपी विमानतळावर उतरणार आहे. ‘फ्लाय 91’ (Fly 91) विमान कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात येत असून, गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या सिंधुदुर्गवासीयांची प्रतीक्षा आता संपली आहे. चिपी सिंधुदुर्ग ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग या पहिल्याच दिवसाच्या दोन्ही उड्डाणांचे बुकिंग जवळजवळ फुल्ल झाले आहे.

यापूर्वी चिपी विमानतळावरून ‘अलायन्स एर’ (Alliance Air) कडून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता; परंतु तांत्रिक बिघाड, खराब हवामानामुळे अचानक रद्द होणारी सेवा, वेळात सतत होणारे बदल तसेच सुट्यांच्या व सणासुदीच्या काळात गगनाला भिडणारे तिकिटांचे दर आणि मोपा विमानतळावरून सुरू झालेली तुलनेने स्वस्त विमानसेवा यामुळे प्रवाशांनी यासेवेकडे पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत चिपी विमानतळावरील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. विमानतळावर सर्वकालीन हवामानात नाईट लँडिंग (Night Landing) सुविधेसह विमान संचालनासाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विमानतळ अधिक सक्षम बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून फ्लाय ९१ कंपनीमार्फत पुणे, हैदराबाद आणि बेंगलोरकरिता विमानसेवा सुरळीत सुरू असून, त्यात आता नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवेची भर पडली आहे.

पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी ही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून (आजपासून) सुरू होणारी ही विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. सन १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला होता. शेती आणि मासेमारीसोबतच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे आणि आर्थिक समृद्धी यावी, हा त्यामागील मुख्य उद्देश होता. या पर्यटन धोरणाला बळ देण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी-वेंगुर्ला येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली होती.

Jadhav acadamy

दरम्यान, विमानतळ सुरू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा खंडित झाली होती. त्यानंतरच्या काळात महायुती सरकार आल्यानंतर विमानतळाच्या विकासाला वेग देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी ‘वायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यामुळे मोठ्या विमान कंपन्यांनाही येथे सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

ताज हॉटेल प्रकल्प आणि पर्यटनाचा विस्तार
गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्गात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प आले असून, वेंगुर्ला वेळाघर तसेच देवगड येथे प्रस्तावित ताज हॉटेल प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्राला आणखी मोठी चालना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात येण्यासाठी उत्सुक आहेत. थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, टूर गाईडपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आर्थिक सक्षम होण्याची संधी मिळेल. जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटन व्यवसायातील या संधी ओळखून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. आजचे हे उड्डाण म्हणजे केवळ विमानाचे टेकऑफ नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने मिळालेली नवी भरारी ठरणार आहे.