जुनी ‘शेंगदाणा’ बिल्डिंग जमीनदोस्त करून उभारण्यात येणार कॉर्पोरेट लूक असलेली भव्य वास्तू; पूरस्थितीचा विचार करून तळमजला पूर्णपणे मोकळा ठेवणार
चिपळूण: शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या Chiplun Municipal Council Building ची जुनी आणि जीर्ण झालेली इमारत आता लवकरच जमीनदोस्त केली जाणार असून, त्याच जागेवर एका नव्या, अत्याधुनिक व कॉर्पोरेट लूक असलेल्या इमारतीचे निर्माण केले जाणार आहे. नव्या प्रशासकीय इमारतीसाठी नुकतेच भूमिपूजन झाले असून, आगामी दोन वर्षांत ही भव्य वास्तू चिपळूणकरांच्या सेवासासाठी उभी राहणार आहे. आगामी सुमारे ५० ते ७० वर्षे याच प्रशासकीय इमारतीमधून चिपळूण शहराचा कारभार चालणार असून, ही वास्तू शहराच्या वैभवात मोठी भर घालणार आहे.
चिपळूण नगर परिषदेची ही नवीन प्रशासकीय इमारत सर्व्हे क्रमांक ५,९०९ चिपळूण येथे प्रस्तावित करण्यात आली आहे. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना (सन २०२५-२६) अंतर्गत हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, आधुनिक वास्तुकला, नागरिकांसाठी सुलभ सेवा आणि नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण यांचा उत्कृष्ट संगम साधून या इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण शहरातील दरवर्षीची गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन या इमारतीचा तळमजला पूर्णपणे मोकळा (स्टिल्ट) ठेवण्यात आला आहे, जेणेकरून पुराच्या पाण्यामुळे प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या ‘टाईप प्लॅन’चा आधार घेऊन व स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करून या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही इमारत तळमजला आणि त्यावर तीन मजले अशी असणार असून भारतीय मानक संहितेनुसार ती पूर्णपणे भूकंपरोधक बनवण्यात आली आहे.
अशी असेल नव्या इमारतीची रचना आणि सुविधा

तळमजला (वाहनतळ व प्रवेशद्वार): इमारतीच्या तळमजल्यावर नियमांनुसार कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी प्रशस्त वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येथे इनडोअर आणि आउटडोअर मिळून ३६ चारचाकी वाहने आणि ३९० दुचाकी वाहने उभी करण्याची क्षमता आहे. तसेच येथे भव्य प्रवेश लॉबी, विद्युत नियंत्रण कक्ष, दोन जिने आणि आपत्कालीन स्ट्रेचर लिफ्टसह १० प्रवासी क्षमतेच्या दोन लिफ्ट्सची व्यवस्था असणार आहे.
पहिला व दुसरा मजला (कार्यालये व विभाग): पहिल्या मजल्यावर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी थेट संबंधित विभागांची कार्यालये असतील. यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कार्यालय, सात विषय समिती सभापतींची कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, स्वच्छता विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, वाहन विभाग, अग्निशमन विभाग, दिव्यांग विभाग, भांडार व लिपिक विभाग आणि विद्युत अभियंता विभागाचा समावेश आहे.
तिसरा मजला (सभागृह व बैठक व्यवस्था): तिसऱ्या मजल्यावर नगर परिषदेच्या महत्त्वाच्या बैठकांसाठी अत्याधुनिक व्यवस्था केली आहे. येथे ध्वनिनियंत्रण प्रणाली, अँटी-चेंबर आणि पॅन्ट्रीसह २९०.१७ चौ. मी. क्षेत्रफळाचे भव्य मुख्य सभागृह उभारले जाणार आहे, ज्यामध्ये ६२ नगरसेवक आणि २० कर्मचाऱ्यांची आसनक्षमता असेल. याशिवाय स्थायी समिती सभागृह, कर्मचारी भोजन कक्ष, अभिलेख कक्ष, व्हीआयपी लाऊंज, संगणक विभाग आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष असणार आहेत.
या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ३,९५६.९० चौ. मी. एवढे भूखंड क्षेत्रफळ उपलब्ध असणार असून, दिव्यांग नागरिक व अभ्यागतांच्या सुविधेसाठी रॅम्प, लिफ्ट, रुंद जिने, पॅसेज आणि पुरेशा पाणीपुरवठ्यासह स्वच्छतागृहांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.













