रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा: प्रथमेश बेडगे महाराष्ट्राच्या जलतरण संघाचे प्रशिक्षक!

रत्नागिरी: रत्नागिरीच्या क्रीडा इतिहासात एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला आहे. येथील सुपुत्र प्रथमेश संजय बेडगे यांची महाराष्ट्राच्या जलतरण संघाचे “टीम कोच” म्हणून निवड झाली आहे. रत्नागिरीतून महाराष्ट्राच्या जलतरण संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झालेले ते पहिलेच व्यक्ती आहेत. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

बेंगळूर, कर्नाटक येथे ४ आणि ५ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या ४१व्या सब-ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत राज्याच्या संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रथमेश बेडगे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

प्रथमेश बेडगे हे स्वतः एक उत्कृष्ट जलतरणपटू आहेत. त्यांनी बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल या प्रकारांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. केवळ पूलमध्येच नव्हे, तर खुल्या समुद्रातही त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे झालेल्या ५ आणि १० किलोमीटरच्या सागरी जलतरण स्पर्धा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

त्यांच्या साहसी वृत्तीची ओळख एन.सी.सी. (NCC) मधील ‘सेलिंग’ मोहिमेतून झाली. रत्नागिरी ते मुंबई आणि मुंबई ते रत्नागिरी असा धाडसी प्रवास त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला होता. यामुळे त्यांना “धाडसी जलतरणपटू” म्हणून ओळख मिळाली.

प्रशिक्षणाच्या क्षेत्रातही प्रथमेश यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे “लेव्हल १ आणि लेव्हल २” चे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. अनेक वर्षांपासून ते S.M. Swimming Coaching Institutes (ग्लोबल स्कूल स्विमिंग पूल) मध्ये ‘गेस्ट कोच’ म्हणून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत.

प्रथमेश यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेचे पदाधिकारी, त्यांचे मित्र आणि आप्तेष्ट यांच्याकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या यशाने रत्नागिरीच्या युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.