बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आज मराठी बालनाट्य दिवस

रत्नागिरी : रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ ला झाला होता. इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली. या निमित्त शनिवारी (ता. २) सकाळी १० वाजता दामले विद्यालय येथे नटराजपूजन आणि बालनाट्य अभिवाचन असा कार्यक्रम होणार आहे. सर्व नाट्यकर्मी आणि रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मराठी बालनाट्य दिवस साजरा करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे केले आहे.

रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्यसंघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना केली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य, या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 02/Aug/2025