रत्नागिरी : कुस्तीचा खेळ पुन्हा एकदा बहरावा आणि रत्नागिरीतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ झाला. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत, सकाळी १० ते ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे १० शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत. या शिबिरात मुलांना कुस्तीचे मूलभूत ज्ञान आणि बारकावे शिकता येणार आहेत, जेणेकरून भविष्यात चांगले पैलवान तयार होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
या उद्घाटन समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह क्रीडा अधिकारी सुनील कोळी, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी, कार्याध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, तसेच अन्य पदाधिकारी अमित विलणकर, आनंद तापेकर, योगेश हरचेकर, सैफुद्दीन पठान, नवनाथ जाधव आणि प्रशिक्षक झाकीर सय्यद हेदेखील उपस्थित होते. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील कुस्तीला निश्चितच एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 02-08-2025














