गुहागर : पालशेतमध्ये महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात

गुहागर : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये गुहागर तहसीलदार महसूल विभाग यांच्या वतीने पालशेत मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचा पालशेत पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ, खातेदार, विद्यार्थी, महिलांनी लाभ घेतला.

यावेळी पालशेत पंचक्रोशीतील पालशेतसह आडूर, वेळणेश्वर, वेळंब, मळण, पोमेंडी आदी सजातील महसुली अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह शेतकरी बंधू आणि भगिनी तसेच अनेक मान्यवरांनी मोठ्यासंख्यने उपस्थिती दर्शवली होती.

या शिबिरामध्ये जिवंत ७/१२ टप्पा २ या अनुषंगाने कामकाज व अर्ज स्वीकारणे, ७/१२ वाटप, फेरफार अदालत अँग्रीस्टॅक नोंदणी, संजय गांधी निराधार योजना लाभ मंजुरी आदेश, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना लाभ मंजुरी आदेश, जात रहिवास, अधिवास, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर दाखले वाटप, शिधापत्रिका वाटप, भोगवटा वर्ग २चे वर्ग १ करण्याकामी कामकाज, सलोखा योजना, कातकरी समाजातील लोकांना दाखले वाटप, आधार अपडेट, पीएम किसान योजना व अशा विविध योजनांच्या लाभासाठी लागणारी कागदपत्रे तसेच सामाजिक लाभाचे वितरण अशा सर्वंकष महसूली सेवा आणि सुविधांचा समावेश होता.

यावेळी उपस्थित शेतकरी, खातेदार, महिला व ग्रामस्थांना अँग्रीस्टॅक नोंदणी योजना आणि पीक पाहणी योजनेबाबतची माहिती अडूरच्या ग्राम महसूल अधिकारी एस.आर. लटे यांनी दिली, तर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेची माहिती पोमेंडीच्या ग्राम महसूल अधिकारी कानडे यांनी दिली.

या शिबिरामध्ये ७/१२, उत्पन्न दाखले, जातीचे दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पालशेतच्या ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पी. पी. घाणेकर, तर नियोजन मंडळ अधिकारी प्रशांत कानिटकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 02/Aug/2025