रत्नागिरी : एम.आय.डी.सी. परिसरात एका व्यक्तीकडून तब्बल अडीच कोटी रुपये किमतीची ‘व्हेलची उलटी’ (अंबरग्रीस) जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेने तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण अडीच कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला १ ऑगस्ट, २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, एक इसम लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी एम.आय.डी.सी. परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे सापळा रचला आणि रात्री १०.४५ च्या सुमारास छापा टाकला.
छाप्यादरम्यान, एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१, रा. रत्नागिरी) याला कोणतीही परवानगी नसताना, बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने २.५ किलो वजनाचे अंबरग्रीस बाळगताना पकडण्यात आले. जप्त केलेल्या अंबरग्रीसची किंमत अंदाजे २,५०,००,००० रुपये असून, त्याच्याकडील ५०,००० रुपये किमतीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण २,५०,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस उप-निरीक्षक संदीप ओगले आणि इतर पोलीस अंमलदार सहभागी होते.














